मुंबई, 04 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे थरारक आणि हृदय पिळवटून टाकणारे फोटो समोर आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या फोटोंमधून हत्येतील क्रूरता उघड झाली असून, अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता माध्यमांतून या हत्येचे धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून, सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या हत्येचा जोरदार शब्दांत निषेध केला आहे.
https://x.com/supriya_sule/status/1896778695672553811?t=7TlEEVc6MbTdOtn56QXQjA&s=19
सूत्रधारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे: सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले की, “ संतोष देशमुख यांना मारहाण होत असतानाचे फोटो माध्यमांनी प्रसारित केले आहेत. हे फोटो पाहताना कोणत्याही संवेदनशील माणसाचा संताप झाल्याशिवाय राहणार नाही. हत्येतील क्रौर्य पाहून माणुसकीला काळीमा फासला गेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज देशमुख कुटुंबीयांच्या न्याय्य मागणीच्या मागे ठामपणे उभा आहे. स्व संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे. सरकारने या प्रकरणातील सर्व सूत्रधारांवर कठोर कारवाई केली पाहिजे.”
https://x.com/RRPSpeaks/status/1896601102172442690?t=paXHOqUXFw2VtmomondSXQ&s=19
राक्षसी प्रवृत्तीचा कळस: रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त करत, “मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या व्हायरल झालेल्या थरारक, भयानक आणि घृणास्पद फोटो आणि व्हिडिओंनी महाराष्ट्र सुन्न झाला आहे. संतोष देशमुख यांच्या शरीराशी अक्षरशः खेळणाऱ्या या हैवानांना फाशी दिलं तरी ती शिक्षा कमी होईल आणि राक्षसांनाही लाज वाटेल असंच एकंदर हे हत्याकांड आहे. हे रक्तरंजीत फोटो पाहून प्रत्येकाच्या मनात संतापाची त्सुनामी उसळलीय आणि याच संतापातून उद्या महाराष्ट्राच्या भावनेचा उद्रेक झाला तर आश्चर्य वाटणार नाही.”
https://x.com/NANA_PATOLE/status/1896833460393882058?t=cBRdTYRdXU5qeOwFrIsMpQ&s=19
नाना पटोले काय म्हणाले?
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे प्रसारमाध्यमांमध्ये आलेले फोटो पाहून मनाला अतिशय वेदना झाल्या. मारेकऱ्यांनी क्रूरतेची परिसीमा ओलांडली असून, त्यांच्या राक्षसी कृत्याने कुणाच्याही काळजाचा ठोका चुकावा. तब्बल 80 दिवस पुरावे सरकारकडे असतानाही कोणतीच कारवाई झाली नाही. या संवेदनहीनतेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न आहे. सरकारकडे जर कणभर संवेदना आणि माणुसकी उरली असेल, तर हत्याकांडातील सर्व सूत्रधारांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी.”
https://x.com/AUThackeray/status/1896802033539121399?t=1UEV8s8rgwlM5Vkbe8i0aQ&s=19
हे सरकार बरखास्तच करायला हवं: आदित्य ठाकरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत म्हटले की, “सरपंचाच्या हत्येचे पुरावे आणि फोटो अनेक दिवसांपासून खात्याकडे असताना इतका उशीर का झाला? आपल्या पक्षाच्याच कार्यकर्त्याची अशी हत्या होते आणि सरकार काहीच करत नाही? आता केवळ मंत्रीपदाचा राजीनामा घेऊन थांबू नका, संबंधित प्रत्येकावर कठोर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्राला न्याय हवाय, हे सरकार बरखास्त केलं पाहिजे.”
राज्यभरात संतापाची लाट
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून, सरकारवर चौफेर टीका होत आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.