संभाजीराजे छत्रपती यांच्या नवीन पक्षाला मान्यता! निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिले

कोल्हापूर, 01 ऑक्टोंबर (विश्वजीत खाटमोडे) संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा केली आहे. संभाजीराजे यांनी नवीन पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाचे नाव ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ असे असणार आहे. त्यांच्या या राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाने देखील मान्यता दिली आहे. तसेच निवडणूक आयोगाने यावेळी संभाजीराजे छत्रपती यांच्या पक्षाला चिन्ह दिले आहे. ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ असे त्यांच्या पक्षाच्या चिन्हाचे नाव आहे. त्यानंतर आता त्यांचा हा पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे. याची माहिती संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली आहे.

https://x.com/YuvrajSambhaji/status/1840974517281440223?t=QcNE0ndUZ1_5UKu9raEsgA&s=19

संभाजीराजे काय म्हणाले?

स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, दि. 09 ऑगस्ट 2022 रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली ‘स्वराज्य संघटना’ आता भारतीय निवडणूक आयोगाकडे ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून ओळखला जाईल. याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.

कार्यकर्त्यांना आवाहन

“मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे. आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित,” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *