समरजितसिंह घाटगे यांचा शरद पवारांच्या पक्षात जाहीर प्रवेश!

कोल्हापूर, 04 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. कोल्हापुरातील भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

https://x.com/PawarSpeaks/status/1831204192964473303?s=19

https://x.com/NCPspeaks/status/1831031874376056895?s=19

विधानसभेचे तिकीट देण्याची घोषणा

यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. याप्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी समरजितसिंह घाटगे यांना विधानसभेचे तिकीट देण्याची घोषणा केली आहे. “मला अतिशय आनंद आहे समरजित यांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये यायचा निकाल घेऊन आज त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत. तुम्हा सर्वांना शब्द देतो, तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यावर त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतांनी तुम्ही पाठवा. मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्यानंतर ते नुसते आमदार राहणार नाहीत. त्यांना हवं ते काम करण्याची संधी ही देणार आहे, हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून आहे,” असे शरद पवारांनी यावेळी म्हटले आहे.



तत्पूर्वी, काही महिन्यांपूर्वीच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर, विधानसभेत देखील आपली ताकद दाखवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सज्ज झाला आहे. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या राज्यभरात दौरे करताना दिसत आहेत. तसेच ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात इतर पक्षातील काही नाराज नेते जाहीर प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे हे कोणत्या पक्षाचे नेते असतील? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *