मुंबई, 05 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अशातच सलमान खानच्या चित्रपटाचे शूटिंग पाहण्यास मज्जाव केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊन धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या या व्यक्तीला सध्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्याची आता पोलीस चौकशी करीत आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
https://x.com/ANI/status/1864366261804912685?t=GKNHNd5SiG_qjtpSF7HQqw&s=19
काय आहे प्रकरण?
अभिनेता सलमान सध्या बिग बॉस 18 हा रिअलिटी शो आणि सिकंदर या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान खानच्या या चित्रपटाचे शूटिंग मुंबईतील दादर पश्चिम येथे सुरू असल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान बुधवारी (दि.04) एक अज्ञात व्यक्ती सलमानला भेटण्यासाठी शूटिंगच्या सेटवर आला होता. यावेळी त्या व्यक्तीने आपण सलमानचा फॅन असल्याचा दावा केला. या व्यक्तीला चित्रपटाचे शूटिंग पहायचे होते. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला चित्रपटाचे शूटिंग पाहू दिले नाही. त्यानंतर तो व्यक्ती संतापला आणि त्याने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली. बिष्णोईला सांगू काय? अशी धमकी त्याने यावेळी दिली. त्यानंतर येथील सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, हा व्यक्ती मुंबईचा रहिवासी असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याची सध्या पोलीस चौकशी करीत आहेत.
सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर काही आरोपींनी गोळीबार केला होता. याप्रकरणी काही जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तसेच 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांची हत्या बिश्नोई टोळीकडून करण्यात आल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. तरी देखील सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.