सलमान खानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी, दोघांना अटक

मुंबई, 19 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सलीम खान हे मॉर्निंग वॉकसाठी आले होते, त्यावेळी स्कूटरवरून आलेल्या दोघांनी सलीम खान यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकावले. याप्रकरणी सलीम खान यांच्या अंगरक्षकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, दोघांना अटक करण्यात आली आहे.

https://x.com/ANI/status/1836678082381680960?s=19

सलीम खान यांना धमकी

सलमानचे वडील सलीम खान हे सकाळी नेहमीप्रमाणे वांद्रे येथे मॉर्निंग करीत होते. त्यावेळी स्कूटरवर एक व्यक्ती आणि बुरखा घातलेली एक महिला त्यांच्याजवळ आली आणि त्यांनी सलीम खान यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली. “लॉरेन्स बिश्नोईला बोलावू का?” अशाप्रकारे त्यांनी सलीम खान यांना धमकी दिली. याप्रकरणी सलीम खान यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांनी या दोघांची चौकशी केली असता चौकशीदरम्यान दोघांनीही सलीम खान यांच्यासोबत विनोद करत असल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास वांद्रे पोलीस करीत आहेत.

सलमानला अनेकवेळा धमक्या

दरम्यान, सलमान खानला यापूर्वी ही अनेकदा लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमक्या मिळालेल्या आहेत. याप्रकरणी अनेकांना अटक झालेली आहे. यामध्ये काही महिन्यांपूर्वी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या घरावर दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सहा जणांना अटक केली होती. तर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने फेसबुक पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मुंबई पोलिसांनी सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. या घटनांमुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *