मुंबई, 16 जानेवारी: (विश्वजित खाटमोडे) अभिनेता सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत सैफ अली खान हा जखमी झाला असून, त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत वांद्रे पश्चिम येथील सैफच्या घरात घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुरूवारी (दि.16) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा करीत आहेत.
https://x.com/ANI/status/1879723749576212681?t=9y5coHQD9bsL9ejjzPMHCw&s=19
वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. तपासासाठी मुंबई पोलिसांचे पथक सैफ अली खानच्या घरी पोहोचले आहे. माहिती गोळा करण्यासाठी पोलीस सैफ अली खानच्या घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी करीत आहेत.
कशी घडली घटना?
प्राथमिक माहितीनुसार, रात्री 2 वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या मुंबईतील घरात घुसला आणि तो व्यक्ती मोलकरणीसोबत वाद घालू लागला. त्यांच्या वादामुळे सैफ अली खान झोपेतून जागा झाला. त्याने त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागावलेल्या व्यक्तीने सैफ यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्या व्यक्तीने सैफवर चाकूने सहा वार केले. त्यानंतर तो व्यक्ती पळून गेला. दरम्यान, या हल्ल्यात सैफच्या घरातील मोलकरीणही किरकोळ जखमी झाली आहे. तिच्यावर देखील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चोरीच्या उद्देशाने हल्ला?
सैफ अली खान यांच्या टीमने सांगितले की, हा प्रकार चोरीचा प्रयत्न होता. त्यांनी माध्यमे आणि चाहत्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. सैफ यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. डॉक्टरांनी सांगितले की, सैफची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
https://x.com/ANI/status/1879750146097037395?t=7nEnjZnNn2IMisPEiY2m4w&s=19
पोलिसांपुढे आरोपीला पकडण्याचे आव्हान
घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यांनी घटनास्थळी श्वानपथक बोलावले आहे. पोलिस उपायुक्त दीक्षित गेदम यांनी सांगितले की, हा प्रकरण गंभीर असून घुसखोर कोण होता? या हल्यामागे त्याचा उद्देश काय होता? तसेच सैफ अली खानच्या घराबाहेर इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही ही हा व्यक्ती घरात कोठून शिरला? याचा शोध घेतला जात आहे. सध्या या घटनेचा अधिक तपशील मिळत आहे आणि पोलिस चौकशी सुरू आहे.