मुंबई, 17 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी (दि.17) सकाळी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, हा हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाला होता. हल्ला करणारा हा व्यक्ती सैफच्या घराच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याचा पहिला फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये तो पाठीवर बॅग घेऊन फिरताना दिसत आहे. या फोटोच्या आधारे मुंबई पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
https://x.com/ANI/status/1880137829310951464?t=V-0ozmlGC-r_J5PX7Xhj_w&s=19
सीसीटीव्ही फुटेजमधील दिसणारा हाच हल्लेखोर असणार का?
मुंबई पोलिसांनी हल्लेखोरासारखे दिसणाऱ्या अनेक लोकांची चौकशी केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीसारखाच दिसणाऱ्या या व्यक्तीला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, त्याच्याकडे फुटेजमध्ये दिसणाऱ्या बॅगेसारखीच बॅग आढळून आली आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती हाच आहे का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याचा तपास सध्या मुंबई पोलीस करीत आहेत.
चोरीच्या उद्देशाने हल्ला
सैफ अली खान याच्यावर गुरूवारी (दि.16) रात्री 2 वाजता एका संशयिताने हल्ला केला. ही घटना सैफ अली खानच्या मुंबईतील निवासस्थानी घडली. प्राथमिक तपासानुसार, आरोपी चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता. सैफच्या मोलकरणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने एक कोटी रुपये मागितले होते. या हल्ल्यात सैफला सहा ठिकाणी दुखापत झाली असून, त्यातील दोन जखमा गंभीर आहेत. सैफच्या मणक्याजवळ आणि मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
https://x.com/PTI_News/status/1880152523329482789
डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी आज (दि.17) सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, रुग्णालयात आल्यावेळी सैफचे शरीर रक्ताने माखलेले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सैफला दोन-तीन दिवसांत डिस्चार्ज मिळेल, असा अंदाज आहे. सैफने शुक्रवारी थोडा फेरफटका मारल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच त्याला एक आठवडा आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.