मुंबई, 18 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (वय 54) याच्यावर गुरूवारी (16 जानेवारी) त्याच्या अपार्टमेंटमध्ये एका घुसखोराने चाकूने हल्ला केला. या प्रकरणातील हल्लेखोर अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी 30 हून अधिक पोलिस पथके तैनात करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी घटनेनंतर संशयित म्हणून एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, या संशयिताचा सैफ अली खान वरील हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला सोडण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
https://x.com/ANI/status/1880185522091597859?t=Wn6UcZkD2vrHrVo7EIDLZA&s=19
संशयिताची चौकशी आणि सुटका
एएनआयच्या वृत्तानुसार, ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते. कारण तो सीसीटीव्ही फुटेजमधील घुसखोरासारखा दिसत होता. पण चौकशीत तो निर्दोष असल्याचे समजले, त्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. मुंबई पोलिसांनी सांगितलं की, “हा हल्लेखोर एखाद्या टोळीचा भाग नसावा. घुसखोराला कदाचित सैफ अली खानच्या घरी आल्याचे माहीत नसावे. तरी प्रकरणाचा सध्या सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.”
हल्लेखोराचा शोध सुरू
दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या घुसखोराचा चेहरा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. या फुटेजमध्ये तो लाल दुपट्टा घालून आणि बॅग घेऊन पायऱ्यांद्वारे सहाव्या मजल्यावरून खाली पळताना दिसतो. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी 30 हून अधिक पथके तैनात केली आहेत. लवकरच आरोपीचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या घटनेला उलटून दोन दिवस झाले तरीही या हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश येत नसल्याने, मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
घटनाक्रम
मुंबईतील ‘सतगुरु शरण’ इमारतीच्या 12 व्या मजल्यावरील सैफ अली खानच्या अपार्टमेंटमध्ये गुरूवारी (दि.16) मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. हा प्रकार चोरीच्या उद्देशाने घडला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घुसखोराने चाकूने वार करत सैफ अली खानला गंभीर जखमी केले आणि नंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. यावेळी घुसखोराने चाकूने वार करत सैफच्या मान, हात आणि पाठीवर गंभीर जखमा केल्या. घटनेनंतर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सैफ अली खानची प्रकृती स्थिर
त्यानंतर लीलावती रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने सैफ अली खान याच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यावेळी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीच्या कण्यात अडकलेले 2.5 इंच लांब चाकूचे टोक बाहेर काढले. डॉक्टरांनी सांगितलं की, चाकू आणखी 2 मिमी आत गेला असता, तर गंभीर परिणाम होऊ शकले असते. सैफ अली खानची सध्या प्रकृती स्थिर असून, दोन-तीन दिवसांत त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्याला सध्या आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बॉलिवूडमध्ये खळबळ
या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी सैफ अली खान यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे, आणि आरोपी लवकरच पकडला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.