पुणे, 17 ऑक्टोबरः पुण्यात 16 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी ब्रेक फेल झाल्याने भरधाव शिवशाही बसने सात वाहनांना धडक दिली. यामध्ये तब्बल 9 जण जखमी झाले आहेत. सदर अपघात कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर पाषाण तलाव येथे झाला.
विशाल निंबाळकर (वय 26, रा. रामनगर, वारजे माळवाडी, पुणे), अमित झा (35, रा. हिंजवडी), कमलेश महापुरे (28, रा. आळंदी), तानाजी देशमुख (62, रा. कल्याण), कल्पना देशमुख (54, रा. कल्याण) अशी जखमींची नावे आहेत. अन्य चार वाहनांमधील जखमींबाबत माहिती मिळू शकली नाही. विलास जाधव (55, रा. उडतरे, ता. वाई, जि. सातारा) असे शिवशाही बसचालकाचे नाव आहे.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात रोहित पवारांची हजेरी
पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास जाधव हे रविवारी बोरिवली ते सातारा अशी शिवशाही बस (एमएच 04/जेके 3149) घेऊन जात होते. दरम्यान, दुपारी पाषाण तलाव परिसरात आल्यानंतर बसचा अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे जाधव यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने समोर जात असलेल्या वाहनांना धडक दिली.
यामध्ये होंडा डिलक्स (एमएच 42/बीडी 8074), पॅशन प्रो (एमएच 12/केएफ 5627), टाटा टियागो (एमएच 14/जेयु 1620), मारुती एर्टिगा (एमएच 05/सीएम 5319), सेलेरिओ (एमएच 12/एसएफ 3087), स्विफ्ट (एमएच 12/केई 4916), वॅगनआर (एमएच 13/केवाय 3283) या वाहनांचे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
One Comment on “भरधाव शिवशाहीची सात वाहनांना धडक; व्हिडीओ आला समोर”