नागपूर, 30 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे गडमंदिर शोभायात्रेत सहभागी झाल्याने एका दलित तरूणाची हत्या करण्यात आली होती. ही घटना गेल्या रविवारी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी ॲट्रासिटीअंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधारी जातीयवाद पसरवत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही
“नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे गडमंदिर शोभायात्रेत सामील झाल्याने एका दलित युवकाची हत्या होते. मारहाणीत मुस्लीम तरूण जखमी होतो. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. ‘तुम्ही दलित असूनही येथे कशाला आले?’ असे म्हणून केवळ गडमंदिर शोभायात्रेत सामिल झाला म्हणून मारहाण केल्याचे पीडिताच्या वडिलांनी पोलीस जबाबात सांगितले आहे. ही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी आहे.” असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. थोर संतांची, समाजसुधारकांची शिकवण महाराष्ट्राला मिळाली आहे. तरीही अशा घटना वारंवार घडत आहेत हे दुर्दैवी आहे. यापूर्वी बीड येथील पारधी समाजाच्या महिलेला विवस्त्र करून मारहाण केली गेली. शेळी आणि कबुतर चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली होती.
महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला
अशा एकामागून एक घटना घडत असताना सरकार मात्र गप्प आहे. ह्या घडना घडू नयेत म्हणून सरकारकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. समाजकंटकांना कायमची अद्दल घडविण्याचा दम सरकारमध्ये नाही. म्हणून अशा घटनेत वाढ होताना दिसत आहे. सत्तेत असलेल्यांनी जी जातीय विषाची पेरणी केली त्यातून हे सगळ उगवल आहे. यालाच रामराज्य म्हणायचे काय? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
One Comment on “सत्ताधारी जातीयवाद पसरवत आहेत – विजय वडेट्टीवार”