पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण!

पुणे, 06 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोलकाता येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे या मेट्रो मार्गाचे तसेच विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. या कार्यक्रमात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभागी झाले होते. त्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग आजपासून सुरू होणार आहे.

पीसीएमसी-निगडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन

रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग 6 किमीचा असून, या मेट्रो मार्गाची चाचणी गेल्या महिन्यात 5 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या मेट्रो मार्गाचे देखील भूमिपूजन करण्यात आले आहे. हा मार्ग 4.4 किमी लांबीचा असून, त्यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

तत्पूर्वी, 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या 7 किमी आणि वनाज ते गरवारे या 5 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच 1 ऑगस्ट 2023 रोजी फुगेवाडी ते सिविल कोर्ट 6.91 किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक 4.75 किमी या मेट्रोच्या मार्गांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर आज रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या 6 किमी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाच्या प्रतिक्षेत पुणेकर होते. अखेर त्याचे आज उद्घाटन झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *