नागपूर, 21 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देणार असल्याची घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येईल, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली. हा निर्णयाचा फायदा राज्यातील अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1737478961137909844?s=19
तर ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबविण्यात येईल, अशी माहिती देखील विखे पाटील यांनी यावेळी दिली. याकरिता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ (SNF) साठी प्रति लिटर किमान 29 रुपये दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रोख जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 5 रुपये प्रतिलिटर हे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती विखे पाटील यांनी यावेळी दिली.
ही योजना 1 जानेवारी ते 24 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागू असणार आहे. तर शेतकऱ्यांना या अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात मिळण्यासाठी त्यांनी त्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक आहे की नाही? याची खात्री करावी. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे.