झारखंड, 10 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) झारखंडमधील काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांहून आयकर विभागाने आतापर्यंत 200 कोटींहून अधिक बेहिशेबी रुपयांची रोकड जप्त केली आहे. तर याठिकाणी अजून रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा आकडा 500 कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामध्ये ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील धीरज साहू आणि त्यांच्या नातेवाईकांच्या विविध ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत. तर धीरज प्रसाद साहू यांच्या घरातून अजूनही बेहिशेबी रोकड जप्त करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या अनेक खोल्यांची झडती घेणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे या छापेमारीला आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.
https://x.com/ANI/status/1733078672524165285?s=20
दरम्यान, आयकर विभागाने गेल्या 4 दिवसांपूर्वी खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी धाड टाकली. आयकर विभागाने या ठिकाणांवरून सुरूवातीला 200 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. त्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे आहे. तर गेल्या 4 दिवसांपासून याठिकाणी बेहिशेबी रोकड मोजण्याचे काम सुरू आहे. या नोटा मोजण्यासाठी बँक कर्मचारी याठिकाणी आले आहेत. तसेच नोटा मोजण्याचे यंत्र मागविण्यात आले आहेत. येथे काही लॉकर्स आणि बंद खोल्या उघडणे अद्याप बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या छाप्याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
https://twitter.com/Jairam_Ramesh/status/1733506352117653973?s=19
तर धीरज साहू प्रकरणावरून भाजपने आता काँग्रेसवर निशाणा साधला आहे. जप्त केलेली रक्कम काँग्रेसची असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. या मुद्द्यावरून भाजपने काल देशभरात निदर्शने केली. तर याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून धीरज साहू यांच्या पैशाशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. “खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा काहीही संबंध नाही. आयकर अधिकारी त्याच्या ठिकाणाहून एवढी मोठी रोकड कशी वसूल करत आहेत हे तेच सांगू शकतात. तसेच त्यांनी ते स्पष्ट केले पाहिजे. असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
https://x.com/narendramodi/status/1733040901457322300?s=20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हसण्याचा ईमोजी जोडला आहे. जनतेकडून जे लुटले गेले त्याचा एक-एक पैसा परत करावा लागेल, ही मोदींची हमी आहे. असे त्यांनी म्हटले आहे. तसेच देशवासीयांनी या नोटांचा ढिगारा बघावा आणि मग आपल्या नेत्यांची प्रामाणिक भाषणे ऐकावीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.