बारामती, 18 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (दि.18) खासदार सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे प्रदेश सचिव तथा पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सूर्यकांत वाघमारे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी आरपीआय (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे केली. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनिल शिंदे, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र सोनवणे, बारामती शहराध्यक्ष अभिजित कांबळे उपस्थित होते.
दरम्यान, सूर्यकांत वाघमारे हे मागील साधारणतः 35 ते 40 वर्षापासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत असून या काळात कित्येकदा दलित समाजातील अन्याय अत्याचारग्रस्त पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. अशा पद्धतीचे सामाजिक कार्य करीत असताना कित्येकदा त्यांनी समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा रोष हा ओढावून घेतला आहे.
त्यामुळे त्यांच्या जिविताच्या संरक्षणार्थ त्यांना निशुल्क पोलीस संरक्षण देण्यात आले होते. परंतु आचारसंहितेचे कारण सांगून हे पोलीस संरक्षण आता काढण्यात आले असल्याचे समजते. असे असले तरी इतर काही राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे पोलीस संरक्षण हे कायम ठेवण्यात आल्याचे देखील समजत आहे. त्यामुळे सूर्यकांत वाघमारे यांचे देखील पोलीस संरक्षण पूर्ववत करण्यात येण्याबाबतच्या सूचना संबंधितांना कराव्यात, अशा प्रकारची मागणी यावेळी सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली.