बेंगळुरू, 20 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा ‘आरसीबी अनबॉक्स इव्हेंट’ सोहळा मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फ्रँचायझीने आपल्या संघाच्या नावात आणि लोगोमध्ये बदल केला आहे. त्यानुसार, आरसीबी संघ आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या नावाने ओळखला जाणार आहे. याशिवाय, आरसीबीने यावेळी आपल्या नव्या जर्सीचे देखील अनावरण केले आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
https://twitter.com/RCBTweets/status/1770102167623303500?s=19
बेंगलोरच्या जागी बेंगळुरू!
यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, विराट कोहली आणि महिला संघाची कर्णधार स्मृती मानधना एकाच मंचावर उपस्थित होते. दरम्यान, आयपीएल स्पर्धेत नाव बदलणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज संघाने नावात बदल केला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ 16 वर्षांच्या दीर्घ आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात तीनदा फायनलमध्ये पोहोचला आहे, पण त्यांना अजूनही विजेतेपद मिळवता आलेले नाही. अशा परिस्थितीत आरसीबीने नावात बदल केल्यानंतर त्यांचे नशीब बदलते का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
https://twitter.com/RCBTweets/status/1770151414758592879?s=19
महिला संघाला दिला गार्ड ऑफ ऑनर!
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरूवात करणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील हा सामना 22 मार्च रोजी खेळविण्यात येणार आहे. तत्पूर्वी, यंदाच्या वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेचे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने विजेतेपद पटकावले आहे. त्याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या पुरूष संघाच्या खेळाडूंनी स्मृती मानधना हिच्या नेतृत्वाखालील महिलांच्या चॅम्पियन संघाला गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यावेळी कर्णधार फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, रीस टोपली, मोहम्मद सिराज, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक यांच्यासह विविध खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होते.