पुणे, 28 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यात युवा संघर्ष यात्रा सुरु केली होती. परंतु, रोहित पवारांनी त्यांची ही युवा संघर्ष पदयात्रा आता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हा निर्णय मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी घेतला असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आपण युवा संघर्ष पदयात्रा ही महाराष्ट्र धर्मासाठी, युवांच्या हितासाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या हितासाठी काढली आहे. असे ते यावेळी म्हणाले. याचबरोबर मनोज यांनी आमरण उपोषण केल्यानंतर सध्या अनेक गावांत राजकीय नेत्यांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, गावबंदी केल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला नसल्याचे रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
आयपीएल 2024 चा लिलाव होणार परदेशात!
“मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 25 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरु केले. याची आम्हाला माहिती मिळताच, आम्ही 26 ऑक्टोंबर रोजी एक दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला असे वाटले होते की, जरांगे पाटील यांच्या एका दिवसाच्या उपोषणानंतर हे सरकार कुठेतरी मराठा आरक्षण संदर्भात गांभीर्याने निर्णय घेईल किंवा यासंदर्भात काही चर्चा करेल, पण तसे झाल्याचे दिसले नाही. काल पंतप्रधानांनी येथे येऊन सुद्धा त्यांनी यासंदर्भात कोणतेही वक्तव्य केले नाही. त्यामुळे हे सरकार याबाबतीत किती सिरियस आहे, ते आजतरी सांगता येणार नाही.” अशाप्रकारे रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
ओळख लपवून महिलेशी शारीरिक संबंध ठेवणे गुन्हा!
तसेच, “आमच्यासाठी प्रत्येक युवांचा जीव महत्वाचा आहे. आज जे युवा आत्महत्या करत आहेत, ती गोष्ट बघून अतिशय दुःख वाटतं. अशा परिस्थितीत जरांगे पाटील यांची तब्येत आज खालावत चालली आहे. हे तिथे असणाऱ्या डॉक्टरांचे मत आहे. या सगळ्या गोष्टी बघता आमच्या मनामध्ये विचार येत होता. महाराष्ट्रात सध्या शांततेची गरज आहे. तसेच सगळ्यांनाच एकत्र येणाऱ्या गरज आहे. जे आज युवा पिढीसाठी लढत आहेत, त्यांना आपण सर्वांनी पाठिंबा दिलाच पाहिजे. जरांगे पाटलांच्या आरोग्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. आज जे आत्महत्या करतायेत त्याची नोंद घेतलीच पाहिजे. तसेच या आत्महत्या थांबवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. हे वातावरण आणखी वेगळ्या दिशेने जाऊ नये. तसेच या स्वाभिमानी राज्यात युवांना संधी दिली गेली पाहिजे, यासाठी आम्ही ही युवा संघर्ष पदयात्रा काही काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच योग्य वेळ येईल तेंव्हा ही यात्रा पुन्हा एकदा सुरु करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आणि स्वाभिमानी मराठी माणूस यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी नागरिक म्हणून आम्ही सर्वजण जे आज संघर्ष करत आहेत त्यांच्याबरोबर आहोत. जी काही मदत आम्हा सर्वांना करता येईल. ती शंभर टक्के आम्ही करू.” असे रोहित पवार यावेळी म्हणाले.