अटीतटीच्या लढतीत रोहित पवार यांचा विजय

कर्जत, 23 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत रोहित पवार यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे यांचा 1 हजार 243 मतांनी पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 मते मिळाली. तर राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 लोकांनी मतदान केले. त्यामुळे रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला आहे.

https://x.com/RRPSpeaks/status/1860350519274844487?t=DqEOAKOirOPWuWq8fCOnjQ&s=19

राम शिंदे यांचा सलग दोनदा पराभव

2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी रोहित पवारांनी राम शिंदे यांचा 43 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. या विजयामुळे राष्ट्रवादीने प्रथमच कर्जत जामखेड मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील रोहित पवार आणि राम शिंदे आमने सामने आले. या निवडणुकीच्या मतमोजणीत राम शिंदे हे सुरूवातीपासूनच आघाडीवर होते. मात्र, मतमोजणीच्या अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये रोहित पवारांनी आघाडी मिळवली. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत टिकून ठेवली. त्यामुळे या निवडणुकीत रोहित पवार यांचा 1 हजार 243 मतांनी विजय झाला. या विजयामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण आहे.

रोहित पवारांचे ट्विट

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करून कर्जत जामखेड मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले आहेत. “सर्वप्रथम या विजयाबद्दल कर्जत-जामखेडमधील मतदारांपुढं नतमस्तक होऊन या विजयाचा मी नम्रपणे स्वीकार करतो. आपला विश्वास आणि त्यांचं प्रेम मी कदापि विसरणार नाही. हा विजय माझा नाही तर कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीचा, इथल्या स्वाभिमानी जनतेचा, सामान्य माणसाचा, निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकारी, मित्र, माझं कुटुंब, ‘मविआ’तील घटक पक्षांचे कार्यकर्ते, माझ्यावर प्रेम करणाऱ्या राज्यभरातील अनेकांनी दिलेला आशीर्वाद आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि महाराष्ट्र धर्माचा हा विजय आहे,” असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *