बारामती, 19 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) बारामतीच्या माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात सध्या ‘कृषिक 2024’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 18 ते 22 जानेवारीपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 17 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आणि कर्नाटकचे कृषीमंत्री एन चेलुवरायस्वामी यांच्या उपस्थितीत पार पडले आहे. या कृषी प्रदर्शनाला आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी या प्रदर्शनाची माहिती घेतली.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1748212632480629018?s=19
नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली
दरम्यान, बारामतीतील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, अटल इनक्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिक 2024 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला आमदार रोहित पवार यांनी आज भेट देऊन तेथील नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तुर्कस्थान येथील 3 फुटी कणीस असलेली बाजरी, लाल केळी, ड्रोन, AI मॉनिटर, फुलशेती, मुका देणारी काजळी खिलार बैल जात, पुंगनूर गाय, कपिला, लाल खांदारी वळू, सहिवाल, देवणी गाय व काश्मिरी, आफ्रिकन शेळ्याही या ठिकाणी पाहण्यास उपलब्ध आहेत. याची पाहणी रोहित पवार यांनी यावेळी केली.
प्रत्येक शेतकऱ्याने पहावे असे हे प्रदर्शन आहे: रोहित पवार
“प्रत्येक शेतकऱ्याने पहावं असं हे तंत्रज्ञान असून, मी देखील ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे,” असे रोहित पवार यावेळी म्हणाले. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर कसा केला जातो? जमिनीमध्ये सेंसर तंत्रज्ञान कसं काम करतं? पिकांसाठी आवश्यक घटक अचूकरित्या कसे मिळतात? त्याचा खर्च किती? याची माहिती आमदार रोहित पवार यांनी यावेळी घेतली. “दुष्काळी परिस्थितीत कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा वापर, भविष्यातील शेती याबाबतही या प्रदर्शनातून मार्गदर्शन केलं जातं. आयुष्य ही एक प्रयोगशाळा असून तिथं सातत्याने शिकावं लागतं आणि वेगवेगळे प्रयोगही करावे लागतात. त्यादृष्टीनेच या प्रदर्शनाला मी दरवर्षी भेट देत असतो,” असे ते यावेळी म्हणाले. 22 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन सुरू असून, शनिवार व रविवारी ‘हॉर्स शो’ होणार आहे. हा हॉर्स शो शेतकऱ्यांनी अवश्य बघावा, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.