आळंदी, 25 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) आळंदी परिसरातील चऱ्होली खुर्द येथे एका घरात कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 97 हजार किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी 4 जणांना 2 तासांत अटक केली आहे. ही घटना गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. त्यानंतर हे दरोडेखोर स्कॉर्पिओ गाडीतून पळून गेले होते. याप्रकरणी रमेश विठ्ठल थोरवे (43) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
कोयत्याचा धाक दाखवून केली चोरी
दरम्यान, 22 फेब्रुवारी रोजी रमेश थोरवे आणि त्यांचे कुटुंबीय घरात झोपलेले असताना मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास या दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी रमेश थोरवे, त्यांच्या पत्नी आणि वडील यांना लोखंडी कोयता आणि विळ्याचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. त्यानंतर हे सर्वजण स्कॉर्पिओ गाडीतून पळून गेले.
गुन्ह्यातील आरोपींना 2 तासांत अटक
याप्रकरणाची रमेश थोरवे यांनी तक्रार केल्यानंतर आळंदी पोलिसांनी या आरोपींचा शोध घेणे सुरू केले. त्यावेळी पोलिसांनी या पळून गेलेल्या आरोपींचा व स्कॉर्पिओ गाडीचा 2 तासांत शोध घेऊन या दरोडेखोरांना अटक केली. पृथ्वीराज सुखदेव चव्हाण (26), कोहिनूर विशाल पवार (21), धीरज उत्तम चव्हाण (35), नरेश धनजी सबीरा ऊर्फ हाकला (25) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात कलम 395, 452, 506, ॲक्ट 4 (25) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या आरोपींनी या गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार हे करीत आहेत.