ठाणे, 27 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या 17 वर्षांपासून फरार असलेल्या दरोड्यातील आरोपीला ठाणे शहरातून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने ठाणे पोलिसांसोबत मिळून ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेला हा आरोपी उत्तर प्रदेशचा असून तो 2007 पासून दरोडा आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेशातून फरार झाला होता. याबाबतची माहिती एका अधिकाऱ्याने बुधवारी (दि.27) दिली आहे.
https://x.com/PTI_News/status/1861617654676799856?s=19
सतीश बाबुलाल गुप्ता उर्फ सतीश तिवारी असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील अल्मापूर गावचा रहिवासी आहे. त्याला सोमवारी (दि.25) महाराष्ट्रातील ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातून अटक करण्यात आली, असे खंडणी विरोधी सेलच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, हा आरोपी 2007 मध्ये दरोडा आणि चोरीच्या गुन्ह्यांत मुख्य आरोपी होता. तेंव्हापासून तो फरार झाला होता. फरार झाल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
परंतू, हा आरोपी पोलिसांना शोध लागू नये म्हणून सातत्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता. त्यामुळे पोलिसांना त्याला पकडण्यात यश येत नव्हते. पोलिसांनी देखील त्याचा शोध घेणे सुरूच ठेवले. त्यानंतर हा आरोपी ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी सेल आणि उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने संयुक्तपणे घटनास्थळी छापा टाकला आणि गेल्या 17 वर्षांपासून चोरी आणि दरोडा यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपीला अटक केली.