दिल्ली, 20 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल स्पर्धेच्या 17 व्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी सर्वच संघ आपली रणनीती तयार करताना दिसत आहेत. अशातच दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने आपल्या संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतला पुन्हा एकदा आपल्या संघाचे कर्णधार केले आहे. त्यामुळे रिषभ पंतच्या चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. मात्र त्याचवेळी दिल्लीने डेव्हिड वॉर्नरला कर्णधार पदावरून हटवले आहे.
https://twitter.com/DelhiCapitals/status/1770128888590430692?s=19
वॉर्नरला कर्णधार पदावरून हटवले!
रिषभ पंत याची कर्णधारपदी निवड केल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्स संघाने सोशल मीडियावरून दिली आहे. यावेळी दिल्ली कॅपिटल्सने पंतचा फोटो शेयर करून त्याला संघाचे कर्णधार केल्याचे म्हटले आहे. तत्पूर्वी, गेल्या वर्षी रिषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने दिल्लीच्या संघाची धुरा सांभाळली होती. मात्र त्यावेळी दिल्लीच्या संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली होती. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीला 14 पैकी फक्त 5 सामने जिंकता आले होते. त्यामुळे गेल्या वर्षी दिल्लीचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला होता.
गेल्या वर्षी कार अपघात झाला होता
दरम्यान, रिषभ पंतचा गेल्या वर्षी कार अपघात झाला होता. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे रिषभ पंतला गेल्या आयपीएल स्पर्धेत खेळता आले नव्हते. पंत आता यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळणार असल्याची घोषणा दिल्ली कॅपिटल्स संघाने काही दिवसांपूर्वीच केली होती. तर आयपीएल स्पर्धेला दोन दिवस शिल्लक असतानाच दिल्लीने अचानकपणे रिषभ पंतला कर्णधार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिल्लीच्या संघाची कामगिरी कशी होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.