हैदराबाद, 07 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बीआरएस पक्षाचा पराभव केला आहे. त्यानंतर आता तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते अनुमुला रेवंथ रेड्डी यांनी शपथ घेतली आहे. हैदराबादच्या एलबी स्टेडियमवर रेवंथ रेड्डी यांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते. तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी रेवंथ रेड्डी यांना मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे रेवंथ रेड्डी हे आता तेलंगणा राज्याचे दुसरे मुख्यमंत्री बनले आहेत.
https://twitter.com/INCIndia/status/1732670808760500428?s=19
दरम्यान, तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर रेवंथ रेड्डी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्याचवेळी पक्षातील काही नेत्यांनी रेवंथ रेड्डी यांच्या नावाला विरोध केला होता. त्यानंतर दिल्लीमध्ये काँग्रेसच्या हायकमांडने अखेर रेवंथ रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
रेवंथ रेड्डी यांच्यासह मल्लू भट्टी विक्रमार्का यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय, काँग्रेसच्या एकूण 13 मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये सी. दामोदर राजनरसिम्हा, दुडिल्ला श्रीधर बाबू, नलमदा उत्तम कुमार रेड्डी, पोन्नम प्रभाकर, पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, गद्दाम प्रसाद कुमार, जुपल्ली कृष्णा राव, डी. अनसूया सीताक्का, तुम्मला नागेश्वर राव, कोंडा सुरेखा या नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1732691441309356492?s=19
या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. याशिवाय कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. तसेच या शपथविधी कार्यक्रमाला एक लाखांहून अधिक लोक उपस्थित होते.