स्पेन, 24 मे: (विश्वजीत खाटमोडे) स्पेनमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. स्पेनमधील माजोर्का येथे एका रेस्टॉरंटचे छत कोसळले असल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जास्त वजनामुळे हे छत कोसळले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही दुर्घटना भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता घडली. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
https://x.com/ANI/status/1793782712840466717
आणखी लोक अडकल्याची भीती
न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, हे रेस्टॉरंट तीन मजली असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये मधल्या आणि वरच्या मजल्यांवर खांबांवर विसावलेले मोठे छत होते. हा छत कोसळल्याने अपघात झाला. यामध्ये अनेक लोक गाडले गेले आहेत. या दुर्घटनेतील लोकांना वाचवण्याचे काम बचाव पथकाकडून सध्या सुरू आहे. या ढिगाऱ्याखाली अजून काही लोक अडकले असण्याची भीती बचाव पथकाने व्यक्त केली आहे. त्यामुळे जखमी आणि मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
दरम्यान, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी ट्विटरवर या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. बचाव कार्यावर बारीक लक्ष असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये सांगितले आहे. तसेच त्यांनी स्थानिक लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना असल्याचे ते म्हणाले. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे, असे स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, माजोर्का हे स्पेनच्या भूमध्य समुद्रातील बेलेरिक बेटांमध्ये सर्वात मोठे बेट आहे. जे युरोपियन देशांमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. जिथे हजारो लोक पर्यटनासाठी जात असतात. या घटनेच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये मोठी गर्दी होती.