नागपूर, 20 डिसेंबर (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील लोहगाव विमानतळाचे आज (दि.20) नामकरण करण्यात आले आहेत. लोहगाव विमानतळाचे नामकरण ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ’ करण्याचा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव केंद्र आता सरकारकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात विमानतळाचे नामांतर करण्यात येईल आणि त्यानंतर विमानतळाचे नामांतर करण्यात येईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील ठराव विधानसभेच्या नियम 110 अन्वये मांडला होता. तो ठराव आज विधानसभेने मंजूर केला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर लोहगाव विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे होणार आहे. दरम्यान, विमानतळाचे नामांतर करण्याचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो आणि त्यानंतर नामांतरावर शिक्कामोर्तब होते.
https://x.com/ANI/status/1869953314902945973?t=wV7onMJJJrnnHiiE0e9wzA&s=19
https://x.com/mohol_murlidhar/status/1827759579700105688?t=iOBADuf2sV_paAY7wHWc9w&s=19
मुरलीधर मोहोळ यांनी केली होती मागणी
दरम्यान, पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे. तसेच राज्य सरकारने यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. याबाबत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची ऑगस्ट महिन्यात भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत सप्टेंबर महिन्यात पुणे विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांनी लोहगाव विमानतळाचे नामांतर करण्यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेतला होता. पुण्याचे विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांचे आजोळ होते. त्यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचे नाते जिव्हाळ्याचे होते. शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही आपल्या भूमिकेप्रमाणेच इच्छा असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचे नाव देणे हे अधिक समर्पक असणार आहे. म्हणून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली होती.