महिला डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर

कोलकाता, 13 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांनी आजपासून संप पुकारला आहे. या संपात महाराष्ट्रातील हजारो डॉक्टर सहभागी झाले आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर आज आपल्या सेवा बंद ठेवणार आहेत. तर आपत्कालीन सेवा सुरू असून, रुग्णांना कोणतीही अडचण येत नाही, असे संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणामुळे महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

https://x.com/ANI/status/1823051219528773809?s=19

https://x.com/ANI/status/1823214399978402207?s=19

काय आहेत डॉक्टरांच्या मागण्या?

कोलकात्यातील पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळावा. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात यावेत. तसेच देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी या संपकरी डॉक्टरांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या मागण्यांसाठी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) ने देशातील सर्व निवासी डॉक्टरांना आजपासून संप पुकारण्याचे आवाहन केले आहे. कोलकाता येथील या घटनेच्या निष्पक्ष तपासासाठी हे प्रकरण तातडीने सीबीआयकडे सोपवण्यात यावे. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी. संपूर्ण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. रुग्णालय परिसरात 24 तास सुरक्षा रक्षक असावेत. डॉक्टरांचे कामाचे ठिकाण सुरक्षित असावे आणि याबाबत केंद्रीय सुरक्षा कायद्याचे पालन करावे, अशा या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत.

https://x.com/ANI/status/1822244477060231202?s=19

एका आरोपीला अटक

पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे सर्व डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना 8 ऑगस्ट रोजी घडली होती. 9 ऑगस्ट रोजी सकाळी या महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी संजय रॉय या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर हत्येपूर्वी बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या शरीरावर अनेक जखमा आणि ओरखड्याच्या खुणा होत्या. तसेच चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर रक्ताचे डाग होते. यासंदर्भात कोलकाता पोलिस आयुक्त विनीत कुमार गोयल यांनी माहिती देताना म्हटले की, मृताचे पोस्टमार्टम करण्यात आले असून, या प्रक्रियेची व्हिडीओग्राफीही करण्यात आली आहे. तपासासाठी एसआयटीचीही स्थापना करण्यात आली आहे. आम्ही सर्व प्रकारच्या पुराव्यांचे विश्लेषण केले असून, त्याआधारे आम्ही एका व्यक्तीला अटक केली आहे. सध्या या घटनेचा तपास चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *