पुणे, 26 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस कवायत मैदानावर शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना देशाच्या प्रगतीसाठी आणि ऐक्याच्या दृष्टीने महत्वाचे संदेश दिले.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1883391866487349739?s=19
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1883460314194473446?t=qs5Af2SbMSyzb4usE3q42g&s=19
अनेक मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक देखील या समारंभात सहभागी झाले होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शानदार संचलन
प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे ध्वजवंदनानंतर आयोजित करण्यात आलेले शानदार संचलन. या संचलनात पुणे शहर, पुणे जिल्हा ग्रामीण, पिंपरी-चिंचवड पोलीस दल, पुणे लोहमार्ग, राज्य उत्पादन शुल्क, गृहरक्षक दल, वनविभाग, वाहतूक विभाग, जलद प्रतिसाद पथक आणि अग्निशमन दल यांसह विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला.
अजित पवारांकडून अधिकाऱ्यांचा सन्मान
या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने पोलिस आणि अग्निशमन पदक, सेवापदक आणि शौर्यपदक प्रदान करण्यात आलेल्या, तसेच ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने ‘वीर गाथा राज्यस्तरीय पुरस्कार’ विजेत्यांचा अजित पवार यांनी अभिनंदन केले.