26 जानेवारी रोजी शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश; विद्यार्थ्यांना मिळणारी सुट्टी रद्द?

प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम

मुंबई, 02 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) प्रजासत्ताक दिन हा देशभरात 26 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सामान्यतः या दिवशी शाळांमध्ये ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांना सार्वजानिक सुट्टी दिली जाते. परंतु, यंदा परिस्थिती वेगळी असणार आहे. महाराष्ट्र सरकारने 26 जानेवारी रोजी राज्यातील शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 26 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना मिळणारी सुट्टी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परिपत्रकात काय म्हटले?

या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी (दि.31) एक महत्वाचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात, 26 जानेवारीला शाळांमध्ये आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि उपक्रम याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये प्रभात फेरी, भाषण स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन, खेळ, प्रदर्शनी यांसारखे अनेक कार्यक्रम सुचवण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय अभिमान निर्माण होईल, असे मानले जात आहे. तसेच या कार्यक्रमांत प्रत्येक गावातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व प्रतिष्ठित नागरिक यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तर यंदापासून दरवर्षी प्रजासत्ताक दिन शाळांमध्ये याच पद्धतीने साजरा होईल, याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांनी घेतली पाहिजे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सुट्टी रद्द होणार?

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी झेंडा वंदन केल्यानंतर दिली जाणारी सुट्टी रद्द केली गेली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु, राज्य सरकारने या परिपत्रकात 26 जानेवारीची सुट्टी रद्द केल्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती किंवा निर्देश दिलेले नाहीत. याबाबत शालेय शिक्षण विभागाने अधिक स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. तथापि, शाळांमध्ये यावर्षी 26 जानेवारी रोजी दिली जाणारी सुट्टी कदाचित रद्द केली जाऊ शकते. कारण या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेतील देशभक्तीपर कार्यक्रमांमध्ये भाग घ्यावा लागेल. याबाबतची अधिक माहिती संबंधित शालेय प्रशासन आणि शिक्षण विभाग यांनी देणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *