राज्यात कॅसिनो कायदा रद्द; विधेयक एकमताने मंजूर

नागपूर, 08 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) काही महिन्यांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने 1976 साली मंजूर केलेला महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॅसिनो कायदा रद्द करण्यासंदर्भातील विधेयक विधानसभा सभागृहात मांडले. तर हे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर झाले आहे. या विधेयकामुळे महाराष्ट्रात कॅसिनोला परवानगी देणारा कायदा कायमस्वरुपी रद्द होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता कॅसिनोला परवानगी मिळणार नाही.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1733093477498650977?s=19

यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत म्हणाले की, “महाराष्ट्रात कॅसिनो सुरूच होऊ नयेत, यासाठी ‘1976 चा महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द’ हे विधेयक आज विधानसभेत मांडले. या विधेयकामुळे महाराष्ट्र कॅसिनो कायदा कायमस्वरुपी रद्द होणार आहे. राज्यात कॅसिनो नकोच, ही ठाम भूमिका सातत्याने मी घेतली होती. 1976 पासून अस्तित्त्वात असलेल्या कायद्यामुळे त्याची परवानगी मागण्यासाठी लोक वारंवार न्यायालयात जात होते. त्यामुळे 2016 मध्ये मुख्यमंत्री असताना, तसेच जानेवारी 2023 मध्ये सुद्धा मी महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्यासंदर्भातील भूमिका फाईलवर मांडली होती. राज्यातील युवा पिढीचा विचार करून तसा निर्णय आम्ही मंत्रिमंडळात घेतला आणि अखेर आज हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.”



दरम्यान, राज्यात 22 जुलै 1976 रोजी महाराष्ट्र कॅसिनो कायदा सरकारने लागू केला आणि महाराष्ट्रात कॅसिनोला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र 45 वर्षे होऊन गेली तरी या कायद्याचे नियम काही तयार झाले नव्हते. त्यामुळे हा कायदा नियमाअभावी अस्तिवात येऊ शकला नाही. त्यानंतर 2015 मध्ये एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने कॅसिनो कायद्याची अंमलबजावणी संदर्भात राज्य सरकारला प्रश्न केला होता. त्यानंतर देखील याला विलंब लागला. त्यानंतर 18 ऑगस्ट 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातील विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *