बेंगळुरू, 13 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाने आयपीएल 2025 साठी नव्या कर्णधाराच्या रूपात रजत पाटीदारची निवड केली आहे. हा निर्णय संघाच्या भविष्यातील दिशेचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. गेली अनेक वर्षे आरसीबीला आयपीएल विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे नव्या नेतृत्वाकडून संघ आणि चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. फाफ डू प्लेसिसला संघात कायम न ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विराट कोहलीला पुन्हा कर्णधार करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, फ्रँचायझीने युवा आणि प्रतिभावान खेळाडू रजत पाटीदारवर विश्वास दाखवत त्याला संघाचे नेतृत्व दिले आहे.
https://x.com/RCBTweets/status/1889923432982233259?t=IRjZhRWINz36ejq-t4YRfQ&s=19
नव्या नेतृत्वासमोरील आव्हाने
पाटीदारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे नेतृत्व केले असून, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीपर्यंत संघाला पोहोचवण्याची किमया साधली आहे. त्यामुळे त्याला कर्णधार पदाचाही अनुभव असल्याचे दिसून येते. दरम्यान, आरसीबी हा आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे, परंतु अद्याप त्यांना विजेतेपद मिळालेले नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाला काही वेळा अंतिम फेरी गाठता आली, पण विजेतेपद हुकले. डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली संघ सातत्याने चांगली कामगिरी करीत होता, पण आरसीबी संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. अशा परिस्थितीत पाटीदारवर मोठी जबाबदारी असणार आहे.
आरसीबीचा नव्या नेतृत्वावर विश्वास
आरसीबीने विराट कोहलीला 21 कोटी, रजत पाटीदारला 11 कोटी आणि यश दयालला 5 कोटींमध्ये कायम ठेवले. यावरून संघ व्यवस्थापनाचा नव्या खेळाडूंवर असलेला विश्वास स्पष्ट दिसत आहे. रजत पाटीदारने 2021 मध्ये आरसीबीसाठी पदार्पण केले आणि तेव्हापासून संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे. आतापर्यंत त्याने आरसीबीसाठी 27 सामन्यांमध्ये 158.85 च्या स्ट्राइक रेटने 799 धावा केल्या आहेत. नाबाद 112 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात आरसीबी चाहत्यांना नव्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा असतील. आता रजत पाटीदार संघाला आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.