रवींद्र वायकर यांचा ठाकरेंना धक्का! शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुंबई, 11 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथील आमदार रवींद्र वायकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली. तेंव्हापासून रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

रवींद्र वायकर सपत्नीक शिंदे गटात दाखल

अखेर रवींद्र वायकर यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पार पडला. यावेळी रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक कमलेश राय, शिवसेनेचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे संघटक उदय सावंत तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रवींद्र वायकर यांच्या प्रवेशामुळे आनंद होत आहे: एकनाथ शिंदे

दरम्यान, रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा आमदार झाले आहेत. तसेच ते 4 वेळा मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती होते. रवींद्र वायकर यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल आनंद होत असल्याचे मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मुंबई महानगरपालिका, त्यानंतर विधानसभा आणि पक्षाचे काम करण्याचा देखील वायकर यांना प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाचा शिवसेनेला नक्की उपयोग होईल, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच गेल्या अडीच वर्षात राज्यात असलेल्या सरकारने अनेक आमदार, खासदारांची कामे प्रलंबित ठेवल्याने त्यांना काम करणाऱ्या सरकारमध्ये प्रवेश करावा लागला असल्याचे रवींद्र वायकर यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या विभागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील ते नक्की घेतले जातील असेही यावेळी रवींद्र वायकर यांनी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *