पुणे, 10 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठीच्या पत्रकांवर राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह छापले असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भातील पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.
काँग्रेस उमेदवाराकडून ‘घड्याळ’ चिन्ह वापरत आचारसंहितेचा भंग
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) May 9, 2024
३४ पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी आपल्या निवडणुकीच्या प्रचारात ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर केला आहे. जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करून मते मिळवण्यासाठी धंगेकर यांनी प्रचारासाठीच्या पत्रकांवर… pic.twitter.com/vflB7asjaj
प्रचार पत्रकांवर घड्याळ चिन्ह वापरल्याचा आरोप
काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पुणे मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. रवींद्र धंगेकर यांच्या या प्रचारामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रचार पत्रकांवर महाविकास आघाडीतील पक्षांनी जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करून मते मिळविण्याच्या उद्देशाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह त्यांच्या प्रचार पत्रकांवर छापलेले आहे, असा आरोप शिवाजीराव गर्जे यांनी या तक्रारीत केला आहे.
कारवाई करण्याची मागणी
सर्वोच्च न्यायालयाकडील वर उल्लेख केलेल्या आदेशान्वये घड्याळ हे चिन्ह सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निकालास अधीन राहून केवळ अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीस दिलेले आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये आचारसंहितेचा भंग झाला असल्यामुळे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची चौकशी करून दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे. त्यामुळे यासंदर्भात निवडणूक आयोग कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुण्यात तिरंगी लढत
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात म्हणजेच येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात तिरंगी लढत होत आहे. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासोबतच पुण्यात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.