मुंबई, 12 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी शनिवारी (दि.11) याबाबतचे पत्रक जारी केले. सध्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे आहेत आणि त्यांना राज्याचे महसूल मंत्रिपद देण्यात आले आहे. बावनकुळे यांनी अद्याप प्रदेशाध्यक्षपद सोडलेले नसले तरी भाजपने कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे आगामी काळात रवींद्र चव्हाण हेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार असल्याचे निश्चित झाले आहे.
https://x.com/ANI/status/1878101568723018175?t=95QetFvpheQtpFmBxuFoqw&s=19
रवींद्र चव्हाणांनी मानले आभार
कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत. “राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः,” भारतीय जनता पार्टीचा हा मंत्र मनात ठेऊन आजवर राष्ट्रसेवा केली आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या नेहमी निष्ठेने पार पाडल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या मदतीने निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करेन,” असे ट्विट करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास
रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. 2009 पासून सलग चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. मागील महायुती सरकारच्या काळात त्यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रिपद सांभाळले होते. आता त्यांच्याकडे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे.