बारामती, 17 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून रविचंद्रन अश्विन बाहेर पडला आहे. वैयक्तिक कारणांमुळे त्याने राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती बीसीसीआयने दिली आहे. कौटुंबिक कारणामुळे रविचंद्रन अश्विनने कसोटी संघातून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात बीसीसीआय आणि संघ अश्विनला पूर्ण पाठिंबा देत आहे, असे बीसीसीआयने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, रविचंद्रन अश्विनने कौटुंबिक वैद्यकीय कारणामुळे लगेचच कसोटी संघातून माघार घेतली आहे. तसेच बीसीसीआयने त्याच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती प्रसारमाध्यमांना केली आहे.
https://twitter.com/BCCI/status/1758547126781427905?s=19
बीसीसीआयने निवेदनात काय म्हटले?
“बीसीसीआय चॅम्पियन क्रिकेटर रविचंद्रन अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला मनापासून पाठिंबा देत आहे. खेळाडू आणि त्यांच्या प्रियजनांचे आरोग्य आणि कल्याण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अश्विन आणि त्याचे कुटुंब या आव्हानात्मक परिस्थितीतून जात असताना बोर्ड त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करते. बोर्ड आणि संघ अश्विनला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास उपलब्ध राहतील. तसेच आम्ही त्याला आवश्यकतेनुसार मदत करण्यास सदैव तयार आहे. या संवेदनशील काळात चाहते आणि माध्यमांच्या समजूतदारपणाचे आणि सहानुभूतीचे टीम इंडिया कौतुक करते, असे बीसीसीआयने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
अश्विनच्या कसोटीत 500 विकेट पूर्ण
तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेटचा टप्पा गाठला आहे. अनिल कुंबळेनंतर 500 कसोटी विकेट घेणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज बनला आहे. मात्र, आता अश्विनने उर्वरित सामन्यातून माघार घेतल्यामुळे भारत 10 खेळाडूंसह मैदानात उतरला आहे. त्यामुळे या सामन्यात भारताकडे आता जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे चार गोलंदाजीचे पर्याय असणार आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय संघाला रविचंद्रन अश्विनची उणीव नक्कीच भासणार, यात शंका नाही.