रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, राज ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई, 10 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. तत्पूर्वी, रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे, अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

https://x.com/RajThackeray/status/1844310896069214270?t=gFlA27xlGeq-00lVl9N-ng&s=19

राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटले?

ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या 3 दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचे निधन झाले. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात आणि त्यातून तुमच्याही लक्षात आले असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेले योगदान आणि त्याहून महत्वाचे माणूस म्हणून जे त्यांचे मोठेपण आहे, ते अफाट होते, असे राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

तेंव्हाच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करायला पाहिजे होते – राज ठाकरे

अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवे होते. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे, तसेच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असे मला वाटत नाही! काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहीली, मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक 2 मिनिटे स्तब्ध उभे राहीले! आज सकाळपासून सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून? त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे. असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

व्यक्ती हयात असताना सन्मान करणे कधीही चांगले…

तसेच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला. आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *