हैदराबाद, 08 जून: (विश्वजीत खाटमोडे) ईनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांनी आज पहाटे 3.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामोजी राव हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना 5 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयाशी संबंधित काही समस्या होत्या. तसेच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.
https://twitter.com/AHindinews/status/1799258528089252215?s=19
दरम्यान, रामोजी राव हे प्रसिद्ध उद्योगपती, मीडिया उद्योजक आणि चित्रपट निर्माता होते. रामोजी राव यांना माध्यम विश्वातील एक मोठे व्यक्तिमत्व मानले जात होते. ते रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही नेटवर्कचे मालक होते. रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रामोजी राव यांनी मीडिया आणि चित्रपट जगतात खूप नाव कमावले. रामोजी राव यांनी हैदराबादमध्ये रामोजी ग्रुपची स्थापना केली होती. या ग्रुपमध्ये रामोजी फिल्म सिटी फिल्म स्टुडिओ, ईटीव्ही नेटवर्क आणि चित्रपट निर्मिती कंपनी उषा किरण मुव्हीज यांचा समावेश आहे. दरम्यान, तेलुगू चित्रपटातील त्यांच्या कामगिरीसाठी रामोजी राव यांना दक्षिणेतील चार फिल्मफेअर पुरस्कारांसह राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय 2016 मध्ये पत्रकारिता, साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल, पद्मविभूषण, भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
https://twitter.com/narendramodi/status/1799271251082608841?s=19
मोदींनी शोक व्यक्त केला
तत्पूर्वी रामोजी राव यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. “रामोजी राव यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणारे ते द्रष्टे होते. त्यांच्या समृद्ध योगदानाने पत्रकारिता आणि चित्रपट जगतावर अमिट छाप सोडली आहे. आपल्या उल्लेखनीय प्रयत्नांद्वारे त्यांनी मीडिया आणि मनोरंजन विश्वात नवनिर्मितीचे नवे मापदंड प्रस्थापित केले. रामोजी राव गरू हे भारताच्या विकासाविषयी अत्यंत तळमळीचे होते. त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेण्याच्या अनेक संधी मिळाल्या हे माझे भाग्य आहे. या कठीण काळात त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.