नागपूर, 19 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात भाजप नेते राम शिंदे यांची आज (दि.19) विधानपरिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी राम शिंदे यांची निवड झाल्याचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केले. त्यानंतर राम शिंदे यांनी आपला पदभार स्वीकारला. दरम्यान विधानपरिषदेचे सभापतीपद जुलै 2022 पासून रिक्त होते. या काळात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापतीपदी आज अखेर राम शिंदे यांची निवड झाली.
https://x.com/ANI/status/1869624848739365165?t=wBMy6q0KiBxlmYQg4ts-tw&s=19
https://x.com/CMOMaharashtra/status/1869274598770110965?t=-rGHUtc01lLaMqTSU-ke8w&s=19
बिनविरोध निवड
तत्पूर्वी, राम शिंदे यांनी विधानपरिषद सभापतीपदासाठी बुधवारी (दि.18) उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याप्रसंगी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल यांसारखे नेते उपस्थित होते. दरम्यान विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदे यांचा एकमात्र अर्ज आला होता. कारण, महाविकास आघाडीकडे आता इतके संख्याबळ नसल्यामुळे त्यांच्याकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे राम शिंदे यांची सभापतीपदासाठी कालच निवड निश्चित मानली जात होती. त्याची औपचारिक घोषणा आज करण्यात आली आहे.
राम शिंदे यांची थोडक्यात माहिती
राम शिंदे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार आहेत. त्यांनी 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात विजय मिळवला होता. तेंव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांची राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आली होती. तसेच राम शिंदे यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पदही देण्यात आले होते. तर राम शिंदे यांचा 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी पराभव केला होता. त्यानंतर भाजपकडून राम शिंदे यांना विधानपरिषदेचे सदस्यपद देण्यात आले. आता त्यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.