अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर! मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांनाही उमेदवारी मिळाली

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. विशेष म्हणजे, अशोक चव्हाण यांनी कालच भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर एकाच दिवसांत त्यांना पक्षाकडून मोठी संधी देण्यात आली आहे. भाजपने अशोक चव्हाण यांच्यासह मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा भाजपकडून आज करण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1757688142121877623?s=19

मेधा कुलकर्णी यांना देखील संधी मिळाली

अशोक चव्हाण यांनी 12 फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यांनी 13 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना महाराष्ट्रातील मोठे नेते मानले जाते. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. याशिवाय, मेधा कुलकर्णी या पुण्यातील कोथरूडच्या माजी आमदार आहेत. भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यावेळी भाजपकडून त्यांच्याजागी चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे मेधा कुलकर्णी या नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अखेर त्यांना आता भाजपने राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा अजित गोपछडे कोण आहेत?

तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यसभा निवडणुकीसाठी अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित गोपछडे हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. ते पेशाने डॉक्टर आहेत. तसेच अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते देखील आहेत. ते भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रमुख आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि नायगाव विधानसभेसाठी त्यांचे नाव कायमच चर्चेत असते. त्यांना आता भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या नावाची अचानकपणे घोषणा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *