पुरंदर, 30 ऑगस्टः निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र या अस्तरीकरण विरोधात पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची एन्ट्री झाली आहे. पुरंदर तालुक्यातील निरा येथे आज, 30 ऑगस्ट 2022 रोजी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत अस्तरीकरण विरोधी शेतकऱ्यांचा मेळावा होणार आहे. यामुळे निरा डावा कालव्याचे पाणी आता पेटण्याचे चिन्ह दिसत आहे.
बानपचं नागरिकांना जाहीर आवाहन
निरा डाव्या कालव्याचे 152 किलोमीटर पैकी सुमारे 35 किलोमीटर अस्तरीकरण वेगवेगळ्या 29 टप्प्यात होणार आहे. या अस्तरीकरणामुळे कालव्याची गळती रोखता येईल आणि कालव्याची फूट टाळावी यासाठी अस्तरीकरण केले जाईल, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे. मात्र या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या अस्तरीकरणामुळे विहिरींचे पाणी आटून शेतकरी उजाड होईल, भूजल साठा संपून जाईल, शेतकऱ्यांसोबत साखर कारखाने ही गोत्यात येतील, अशी भूमिका मांडत शेतकरी कृती समिती आणि कालवा बचाव समितीने आंदोलन छेडले आहे. याचाच भाग म्हणून अस्तरीकरणाला विरोध करण्यासाठी तसेच पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज मंगळवारी निरा येथे लक्ष्मीनारायण कार्यालयात शेतकऱ्यांचा मेळावा शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी बोलविला. आता या मेळाव्यास राजू शेट्टी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.