अहमदाबाद, 22 मे: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आज एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने बेंगळुरूचा 4 गडी राखून पराभव केला आहे. त्याचबरोबर राजस्थानने आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना आता सनरायझर्स हैदराबाद सोबत होणार आहे. तर दुसरीकडे मात्र रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तत्पूर्वी, या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 विकेट गमावून 172 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्स संघाने त्यांचे हे आव्हान 6 गडी गमावून 19 षटकांत पूर्ण केले.
https://twitter.com/IPL/status/1793341220741411078?s=19
173 धावांचे लक्ष्य
या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने राजस्थान समोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले. यामध्ये बेंगळुरूकडून रजत पाटीदार याने सर्वाधिक 34 धावा केल्या. तर विराट कोहलीने 33, तर महिपाल लोमररने 32 धावा केल्या. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने उत्कृष्ट गोलंदाजी केली. तसेच या सामन्यात त्यांचे क्षेत्ररक्षणही चांगले झाले. यावेळी राजस्थान रॉयल्सकडून आवेश खानने 3, तर आर अश्विनने 2 विकेट घेतल्या.
राजस्थानचा ‘यशस्वी’ पाठलाग!
या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने दमदार सुरूवात केली. या सामन्यात राजस्थानने 5.3 षटकांत 43 धावांची सलामी दिली. यावेळी टॉम कोहलर कॅडमोर 20 धावा करून बाद झाला. या सामन्यात यशस्वी जैस्वालने 45 धावांची खेळी केली. त्यानंतर संजू सॅमसन 17 आणि ध्रुव जुरेल 8 धावा करून बाद झाले. तीन गडी लवकर बाद झाल्याने राजस्थानचा संघ अडचणीत आला होता. परंतू रियान पराग आणि शिमरन हेटमायर यांनी संघाची धुरा सांभाळली. या सामन्यात रियान पराग 36 धावा आणि शिमरॉन हेटमायर 26 धावा करून बाद झाला. शेवटी रोमन पॉवेलने दोन चौकार आणि एक षटकार ठोकत हा सामना जिंकला. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून या सामन्यात मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या. तसेच कर्ण शर्मा, लोकी फर्ग्युसन आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.