अहमदाबाद, 22 मे: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल मध्ये आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात एलिमिनेटरमध्ये सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना सायंकाळी 7:30 वाजल्यापासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यातील हरणाऱ्या संघाचे आयपीएल मधील आव्हान संपुष्टात येणार आहे. तर विजेत्या संघाला 24 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध दुसऱ्या क्वालिफायर मध्ये सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात हे दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार आहेत. तत्पूर्वी, काल सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात क्वालिफायर-1 सामना झाला. या सामन्यात कोलकात्याने विजय मिळवून आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
https://twitter.com/IPL/status/1793222915380642167?s=19
आरसीबीचे सलग सहा विजय!
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा संघ सध्या तुफान फॉर्मात आहे. बेंगळुरूने त्यांचे शेवटचे सहा सामने जिंकले आहेत. बेंगळुरूचे विराट कोहलीसह सर्व फलंदाज चांगल्या धावा करताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या गोलंदाजांना देखील सुरू गवसलेला आहे. तर दुसरीकडे मात्र, राजस्थानने शेवटच्या सहा सामन्यांपैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. त्यातच राजस्थानला सलामीवीर जोश बटलर याची उणीव भासणार आहे. बटलर सध्या मायदेशी परतला आहे. त्यामुळे तो राजस्थानच्या राहिलेल्या सामन्यांना मुकणार आहे.
पाहा दोन्ही संघांचा रेकॉर्ड
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान आणि बेंगळुरू हे दोन संघ एकदाच आमने सामने आले आहेत. या सामन्यात राजस्थानने बेंगळुरूचा 6 विकेटने पराभव केला होता. त्यानंतर राजस्थान आणि बेंगळुरू यांच्यात आज एलिमिनेटरमध्ये सामना होणार आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले आहेत. यापैकी बेंगळुरूने 15 आणि राजस्थानने 13 सामने जिंकले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या दोन्ही संघांत दोनदा सामना झाला. यामध्ये एका सामन्यात राजस्थानने विजय मिळवला, तर एक सामना बेंगळुरूने जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी होणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.