नागपूर, 08 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष भाजपसोबत युती करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मनसेसोबत गेल्या काही काळात आमच्या चर्चा झालेल्या आहेत. विशेषतः मनसेने जेंव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेंव्हापासून त्यांची आणि आमची एकप्रकारे जवळीक वाढली असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ते नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1777240259602100261?s=19
मनसे मोदींसोबत राहील – देवेंद्र फडणवीस
राज ठाकरे हे पहिले व्यक्ती होते की, त्यांनी 2014 साली नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी जाहीरपणे भूमिका घेतली होती. ठीक आहे, मधल्या काही काळात त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. पण आज त्यांना देखील हे मान्य असेल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात ज्याप्रकारे देशाचा विकास केला, एका नव्या भारताची निर्मिती त्याठिकाणी झाली. अशा परिस्थितीत सर्वांनी नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. विशेषतः जे लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहेत, ज्यांच्यासाठी समाज प्रथम आहे, अशा सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी राहिले पाहिजे. म्हणून मला विश्वास आहे की, राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहील. नरेंद्र मोदी यांना त्यांचा पाठिंबा असेल. अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे. पण माझी त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की, त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे राज ठाकरे कोणती भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज ठाकरे हे उद्या भूमिका स्पष्ट करणार?
दरम्यान येत्या 9 एप्रिल रोजी म्हणजेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मनसेचा मुंबईत मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजप सोबतच्या युती संदर्भात भाष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजप-मनसेची युती होते का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तेंव्हापासून मनसे आणि भाजप यांची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.