मुंबई, 18 मे: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर शुक्रवारी महायुतीची प्रचार सभा पार पडली. या सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नेते एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांच्याकडून विविध अपेक्षा व्यक्त केल्या. तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1791496254570008956?s=19
राज ठाकरेंनी मानले मोदींचे आभार
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी हे बरोबर 21 वर्षांनी शिवतीर्थावर आले आहेत. त्यावेळेस आपण कमळातून बाहेर आला होतात आणि 2014 ला आपण कमळाला बाहेर काढलंत. इतर वक्त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करून वेळ वाया घालवला. माझ्या मते त्यांच्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. कारण ते सत्तेत येणार नाही. पण 2019 ते 2014 या काळात मोदीजींनी जी कामं केली त्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.
370 कलम हटविले
राम मंदिर उभारणीच्या आमच्या आशा मावळल्या होत्या पण मोदीजी तुम्ही होतात म्हणून अयोध्येत राममंदिर उभं राहिलं आणि त्या आंदोलनात बलिदान देणाऱ्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती लाभली, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. अनेक वर्ष प्रलंबित कश्मीरला विशेष दर्जा देणार 370 कलम तुमच्यामुळेच हटवलं गेलं. त्यामुळे कश्मीर हे भारतातील इतर राज्यांप्रमाणे आपलंच आहे, हे त्यानंतर वाटू लागलं, असेही ते यावेळी म्हणाले.
मोदींचे कौतुक
शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोटगीच्या बाजूने न्याय दिला होता, पण राजीव गांधींनी कायदा संमत करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. पण मोदीजींनी याच पीडित मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकमधून बाहेर काढलं, त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय कायमचा दूर झाला. त्याबद्दल तुमचं अभिनंदन, अशा शब्दांत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचे कौतुक केले. आता 2024 नंतर जेव्हा मोदीजी आपण पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हाल त्यानंतर माझ्या महाराष्ट्राच्या काही अपेक्षा आपण पूर्ण कराल अशी आशा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या मागण्या
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जुनी मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी. तसेच जवळपास 125 वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा. शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले. या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावं. देशात तुम्ही जसे उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली 20 वर्ष रखडलेला आमचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून घ्यावा, अशा अपेक्षा राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडून व्यक्त केल्या आहेत.