राज ठाकरे दिल्लीत दाखल! मनसे महायुतीत सहभागी होणार?

दिल्ली, 19 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून सध्या बैठका घेतल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरीही महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. राज ठाकरे हे त्यांच्या दिल्ली दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीत मनसेचा सहभाग होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज ठाकरे मोदी-शहांना भेटणार?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-मनसे युतीची चर्चा आहे. या चर्चा आता खऱ्या ठरताना दिसत आहेत. राज ठाकरे सध्या दिल्लीत आहेत. राज ठाकरे हे आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची म्हणजेच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊ शकतात. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत सुरू आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते सध्या दिल्लीत आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नेते हजेरी लावणार आहेत. या बैठकीत मनसेला महायुतीत घेण्याबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसे महायुतीत सहभागी झाल्यानंतर त्यांना 2 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेचा समावेश आहे.

महायुतीला मनसेची साथ मिळणार?

गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार या दोन नेत्यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये जवळपास एक तास चर्चा झाली होती. त्याच्याआधी राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना भेटले होते. तेंव्हापासून राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुती सोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान, मनसे महायुतीत सहभागी झाल्यास महायुतीला आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी राज ठाकरे यांची साथ मिळणार आहे. याचा फायदा भाजप सह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होणार आहे. त्यामुळे मनसे महायुतीत दाखल होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *