मुंबई, 27 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाची प्रत मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे आंदोलन तुर्तास मागे घेतले आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन केले. यासोबतच त्यांनी यावेळी जरांगे पाटलांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. तसेच सरकारने घेतलेल्या या निर्णयासंदर्भात येत्या लोकसभा निवडणूकीआधी पारदर्शकता यायला हवी, असे मत देखील राज ठाकरेंनी व्यक्त केले. यासंदर्भात राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1751189914279194787?s=19
काय म्हणाले राज ठाकरे?
“श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा!” असे राज ठाकरेंनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मराठा समाजाकडून आनंद साजरा
दरम्यान, सरकारने मराठा आरक्षण संदर्भातील मागण्या मान्य केल्यामुळे मराठा समाजात सध्या आनंदाचे वातावरण आहे. मराठा समाजातील लोक सध्या रस्त्यावर उतरून आनंद साजरा करताना दिसत आहेत. बहुतांश गावातील मराठा समाजातील लोकांनी फटाके वाजवून हा आनंद साजरा केला. तसेच सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण सोडले. यावेळी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे आभार मानले. तसेच विजयाचा गुलाल उधळला गेला आहे, त्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, अशी विनंती देखील मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.