फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा, राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली

मुंबई, 09 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील शिवतीर्थावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच आपण यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा, अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

https://twitter.com/mnsadhikrut/status/1777705271915409477?s=19

शिवसेना प्रमुख होणार नाही

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुख होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. या चर्चांना राज ठाकरे यांनी चांगलेच प्रत्यूत्तर दिले आहे. तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका. मी जे अपत्य जन्माला घातलं आहे, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ तेच मी वाढवणार. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत. असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

तुमच्या कष्टाने कमावलेले चिन्ह

तसेच मनसे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याच्या देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. यावर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. “हे रेल्वे इंजिन आहे ना हे तुमच्या कष्टाने कमावलेले चिन्ह आहे. माझ्याकडे आयतं आलेले नाही. सहज आले आहे म्हणून लढवायचे अजिबात नाही. चिन्हावर कॉम्प्रमाईज होणार नाही. त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. “एक गोष्ट स्पष्टच सांगतो, एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे, हे पाहत नाही रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

मोदींनी तरूणाईकडे लक्ष द्यावे

2024 ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. ही देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. माझी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे कि, भारतीय तरूणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या. तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या. जगातला सर्वात तरूण देश आपला भारत देश आहे. आता फक्त 10 वर्ष आहेत. नंतर आपला देश वयस्करांचा होईल. पण आपला देश भलत्याच मुद्द्यांमध्ये भरकटला तर, मात्र ह्या देशात अराजक येईल, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको, हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *