मुंबई, 31 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि.31) पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात आणि सध्या राज्यात सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन याबाबत सविस्तर भूमिका मांडली. तसेच त्यांनी माध्यमांसमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. “मराठा आरक्षण आंदोलनावर मी बोलणार आहे. मात्र त्याआधी मला, काल सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्यावर बोलायचं आहे. या निर्णयाच्या निमित्ताने देशाची लोकशाही यापुढे टिकणार आहे की नाही? याकडे देशातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. सर्वांत मोठी लोकशाही आपल्या देशात आहे. तीच लोकशाही धोक्यात असेल तर सर्वोच्च न्यायालय काय करतंय, याकडे लोकांचं लक्ष आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “तर केवळ शिवसेनेलाच नव्हे तर लोकशाहीला न्याय मिळेल याची मला खात्री आहे. असे होईल याची खात्री असल्यामुळे 31 डिसेंबरला या सरत्या वर्षात राज्यातील अपात्र सरकारला निरोप दिला जाईल.” असे ते यावेळी म्हणाले.
बीडमध्ये आणखी 2 नेत्यांच्या बंगल्यांना आग
तसेच “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या काहीच मार्ग निघताना दिसत नाही. मराठा आरक्षण संदर्भात काल सरकारची एक बैठक पार पडली होती. या बैठकीला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते. एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झाल्याचे कानावर आले आणि दुसरे उपमुख्यमंत्री हे राज्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना याही पेक्षा भाजपचा प्रचार करण्यासाठी रायपुरला गेले होते. ज्यांना राज्यातील मराठा आरक्षणापेक्षा पक्षाचा दुसऱ्या राज्यातील प्रचार महत्वाचा वाटतो. अशी लोकं या समाजाला न्याय देऊ शकतात का? असा प्रश्न सध्या निर्माण होतोय.” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
“मी जरांगे पाटलांना तुमच्या माध्यमातून एक विनंती करतो की, कृपा करून तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका. तुमच्यासारख्या लढवय्याची समाजाला गरज आहे. मी मराठा समाजातील तरुणांना विनंती करतो की, तुम्ही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. तसेच हे आंदोलन शांततेत करा. जाळपोळ करू नका.” असे आवाहन त्यांनी केले. “ज्या आमदारांना माहितेय की, आपण 31 तारखेपासून अपात्र होणार आहोत. त्यांनी आता राजीनामा देण्याची एक पळवाट शोधून काढलीय. गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी ते आता राजीनामा देत आहेत. मी महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांना एक विनंती करतो की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आरक्षणाचा मुद्दा मांडावा आणि पंतप्रधानांनी जर त्यांचे ऐकले नाही तर त्यांनी सर्वसमावेशक आरक्षणासाठी राजीनामे द्यावेत. तरच हा प्रश्न सोडवला जाईल.” असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांचे जरांगे पाटलांना पत्र
One Comment on “पंतप्रधानांसमोर आरक्षणाचा मुद्दा मांडा – उद्धव ठाकरे”