तामिळनाडू, 20 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) दोन दिवसांपासून तामिळनाडू राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच रस्त्यांवर पाणी साचलेले दिसून येत आहे. त्यामुळे येथील लोकांचे घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. या पावसामुळे तामिळनाडूतील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील जनजीवन सध्या विस्कळित झाले आहे. या पुराच्या परिस्थितीमुळे अनेक भागात लोक अडकून पडले आहेत. सध्या तेथे बचावकार्य सुरू आहे. भारतीय लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि हवाई दल हे बचाव आणि मदत कार्यात गुंतलेले आहेत.
https://twitter.com/ANI/status/1737491697334878692?s=19
तामिळनाडू राज्यातील थुथुकुडी जिल्ह्यात पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. या पुरातून 111 जणांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये 15 मुलांचा समावेश आहे. सध्या प्रशासनाकडून पूरग्रस्त भागातील लोकांना मदत सामग्री पुरवण्यात येत आहे. या पूरस्थितीमुळे तामिळनाडूतील 17,000 लोकांना या मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांना खाद्यपदार्थांची पाकिटे देण्यात येत आहेत.
https://twitter.com/ANI/status/1737433593834823786?s=19
या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तामिळनाडूतील अनेक भागांत पूरस्थिती असल्यामुळे येथील शेती पिके पाण्याखाली गेली आहेत. ही पूरस्थिती पाहता तेथील बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
https://x.com/mkstalin/status/1737168373363192149?s=20
राज्यातील पूरस्थिती पाहता, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मिचॉन्ग चक्रीवादळाने तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच राज्यावर आता अतिवृष्टीचे संकट आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.