मुंबई, 15 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील बहुतांश भागांत गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. अशातच कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. याबाबत हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1790673475117408517?s=19
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
आजच्या दिवशी ठाणे, मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, धुळे, सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर, ह्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
तसेच आजच्या दिवशी रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, धुळे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत, तर उद्या नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासोबतच कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार हवामान विभागाने रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी केला आहे. तसेच उद्याच्या दिवशी रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.