पुणे, 26 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज (दि.26) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हल्का पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
https://x.com/RMC_Mumbai/status/1805880748211323036?s=19
या जिल्ह्यांना अलर्ट
कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी आज मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोबतच पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने वरील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात पावसाचा इशारा
राज्यात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रीय झाला आहे. राज्यातील काही भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. तर अनेक भागांत पाऊस झालेला नाही. जून संपत चालला तरीही राज्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तसेच काही भागांत दुष्काळाची परिस्थिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. त्यानंतर या पावसाकडे नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.