पुणे, 14 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुढील काही दिवस दिवसांत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. तसेच काही ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याची पाहायला मिळत आहे.
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1801565671601410137?s=19
या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
तत्पूर्वी, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथील काही जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत आजच्या दिवशी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून वरील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
राज्यातील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यानंतर आता शेतीपिकांच्या पेरण्यांना वेग येणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. यासोबतच उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना देखील या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात 100 मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अशा भागांतील शेतकऱ्यांनी वापसा आल्यानंतरच पेरण्यांचे नियोजन करावे. तसेच पुरेसा पाऊस झाला नसलेल्या ठिकाणी चांगला पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.